जालना- आत्तापर्यंत संशयित रुग्णांचे स्वॅब घेणारे आरोग्य कर्मचारी पडद्यामागे होते. मात्र, खऱ्या अर्थाने हेच कर्मचारी कोरोना योद्धे ठरत आहेत. कारण आजपासून ते शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन संशयित रुग्णांचे स्वॅब घेत आहेत. त्यामुळे हजारो लोकांच्या संपर्कात येणारे हेच खरे कोरोना योद्धे आहेत, अशी पावतीदेखील नागरिक देत आहेत.
जालन्यात संशयित रुग्णांचे स्वॅब घेणे सुरू, जीवाची बाजी लावत कोरोना योद्धे करतात काम
नगरपालिकेच्या वतीने सर्व प्रभागांमध्ये सहा टीमच्या माध्यमातून संशयित कोरोना रुग्णांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. आतापर्यंत कोविड 19 रुग्णालयातच स्वॅब घेणारी ही टीम बाहेर पडली आहे. त्यामुळे या टीमची तयारी काय असते, त्यांची काय परिस्थिती होते? किती काळजी घ्यावी लागते? हा सर्व प्रकार जनतेला पाहायला मिळत आहे.
शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नगरपालिकेच्या वतीने सर्व प्रभागांमध्ये सहा टीमच्या माध्यमातून संशयित कोरोना रुग्णांचे स्वॅब घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी संबंधित नगरसेवकाकडे नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्व माहिती प्रशासनापर्यंत जाऊन स्वॅब देण्यासाठी वेळ लागणार नाही. आज अशा पद्धतीच्या सहा टीम शहरात फिरत आहेत. आतापर्यंत कोविड 19 रुग्णालयातच स्वॅब घेणारी ही टीम बाहेर पडली आहे. त्यामुळे या टीमची तयारी काय असते, त्यांची काय परिस्थिती होते ? किती काळजी घ्यावी लागते ? हा सर्व प्रकार जनतेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनतादेखील आता या क्षेत्रातील धोका पाहात आहे. हे कीट घातल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अंगामध्ये घामाचे पाट वाहायला लागतात. अशा जोखमीच्या कामात जबाबदारी पार पाडणारे हेच खरे योद्धा आहेत. याची पावती आता जनता त्यांना देत आहे.
जालना शहरामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या प्रभागांमध्ये जाऊन संबंधित नगरसेवकांच्या मदतीने नागरिकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. आज संभाजीनगरमध्ये या तपासणीच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, कचेरी रोडवर या तपासणीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे तपासणीसाठी आलेली टीम नागरिकांची वाट पाहत निघून गेली. खरेतर दारात चालून आलेली ही संधी नागरिकांनी घालवू नये, असे आवाहनही नगरसेवक करत आहेत. मात्र, कोरोनाविषयी असलेल्या भीतीपोटी नागरिक तपासणी करून घ्यायला तयार नाहीत.