जालना - आतापर्यंतच्या अहवालानुसार कोरोनाची बाधा होणाऱ्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ रुग्णांचा अधिक समावेश आहे. त्यातही मधूमेह, दमा, अस्थमा, रक्तदाब, असे आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक त्रास जाणवतो. त्यामुळे आता जालना जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे जात, मतदार यादीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना शोधून काढण्याचे आणि त्यांची तपासणी करण्याचे ठरवले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या एका ध्वनीचित्रफितीचे अनावरण यावेळी करण्यात आले.
हेही वाचा...आजारी मुलासमोरच महिलेची केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहांमध्ये जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा नियोजन आणि विकास अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा निबंधक नारायण चव्हाण, एनआयसीचे रवींद्र पडूळकर आदींची उपस्थिती होती.