जालना- महात्मा गांधींना अभिप्रेत असलेली समता पाहायची असेल तर एक वेळा का होईना पंढरीची वारी करा, असा सल्ला हलीमा कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना दिला. जेईएस महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 16 व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात चौथे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.
वारी समतेची या विषयावर बोलताना हलीमा कुरेशी म्हणाल्या, की महात्मा गांधींना जी समता अभिप्रेत होती, त्यांचे सर्व समाजाविषयीचे विचार काय होते? आणि आज ते कसे अस्तित्वात आहेत हे पाहायचे असेल, तर पंढरीची वारी करा. महात्मा गांधींनी खऱ्या हिंदू धर्माचे पालन केले आणि आपणही आपला धर्म पाळला पाहिजे. मात्र, आपल्या धर्माची तत्वे अंधपणाने मान्य करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. पंढरीच्या वारीचे वृत्तांकन करताना आलेले अनुभवही त्यांनी यावेळी कथन केले. भागवत संप्रदाय कोणतीही विषमता मानत नाही आणि त्यामुळेच या वारीमध्ये सर्व जाती धर्म एकत्र आल्याचे पाहायला मिळतात. वारीमध्ये फक्त टाळ न वाजवता डोळे उघडे ठेवून सजगतेने अनेक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत, असे आवाहनही हलीमा कुरेशी यांनी केले.