जालना -सेवेत रुजू होताना भरलेली अनामत रक्कम परत द्यावी, विनाकारण ग्रामसेवकांवर होणाऱ्या कारवाया थांबवाव्यात या आणि अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील 580 ग्रामसेवक आजपासून (दि. 1 ऑक्टोबर) संपावर गेले आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी बैठक घेऊन आश्वासन दिले आहे. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत काम न करण्याचा पवित्रा ग्रामसेवकांनी घेतला आहे.
जालना जिल्हा परिषदेमध्ये नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी म्हणून निमा अरोरा सर्वपरिचित आहेत. मात्र ,त्यांच्या कामाचा बडगा पाहता गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक ग्रामसेवक निलंबित झाले आहेत. असंख्य ग्रामसेवकांच्या विभागीय चौकशी सुरू आहे .मात्र, हे होत असतानाच जिल्ह्यातील सुमारे 90 टक्के ग्रामपंचायती ऑनलाइन देखील झाल्या आहेत. याच्या उलट ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या विभागीय चौकशा आणि दप्तर पडताळणीमध्ये अनेक ग्रामपंचायती मागे असल्याचे दिसून आले आहे. तर काही ग्रामसेवकांनी पाणीपुरवठा योजना आणि स्वच्छ भारत सारख्या योजनांमधून अंग झटकल्यामुळे त्यांना विभागीय चौकशींना सामोरे जावे लागत आहे.