जालना -covid-19 परिस्थितीमध्ये मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. जालना जिल्ह्यातील आठही नगरपालिकांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली. आत्तापर्यंत दोन लाख 32 हजार 940 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे . पोलिस प्रशासनाने देखील 62 हजार 900 रुपये दंड वसूल केला आहे. आरोग्य मंत्राच्या मतदारसंघात असलेल्या घनसावंगी पालिकेत या कारवाईची" ऐसी की तैसी करत" आत्तापर्यंत फक्त 22 पावत्या फाडल्या आहेत, तर एक मार्चपासून एकही पावती फाडून दंड करण्यात आलेला नाही.
आरोग्य मंत्र्याच्या मतदारसंघातच कारवाईकडे दुर्लक्ष -
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा घनसावंगी हा मतदारसंघआहे. मात्र, या मतदारसंघातच सर्वात कमी दंड आकारण्यात आला असून आतापर्यंत फक्त 22 लोकांनाच दंड करण्यात आला आहे. या 22 लोकांकडून केवळ चार हजार चारशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एक मार्चपासून एकही पावती फाडण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोग्य मंत्र्याच्या मतदारसंघातच ही परिस्थिती असेल तर दुसऱ्याला बंधन घालून उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.