जालना- जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. कापूस मका ज्वारी सोयाबीन उडीद ही हातची पिके गेली आहेत. त्यामुळे शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी २५ हजार तर फळबागांना एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
आज शिवसेना जालना जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. सरासरी ६८८ मिलीमीटर एवढ्या पावसाची क्षमता असताना ६६९ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा फेरा १ लक्ष २५ हजार ९६७ हेक्टर, कापूस २५ हजार हेक्टर, मका ४८ हजार ८१५ हेक्टर, बाजरी ७ हजार ६५६ हेक्टर पेरण्यात आली होती. या पेरणी पैकी सुमारे ५० टक्के पेरणी अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहे.