जालना - शहरातील प्रभागांमध्ये विकास कामे झाली नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे होत असलेल्या त्रासामुळे शहरातील गायत्रीनगर भागात असलेल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
हेही वाचा -दाजीसाठी मेहुणे आले धावून, धनंजय मुंडेची गंगाखेडमध्ये सभा
या भागात नगरपालिकेचे पाणी नाही, विजेच्या खांबावर दिवा नाही, तसेच परिसरात असलेल्या घाणीमुळे संध्याकाळी 7 वाजेनंतर घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. या भागात असलेल्या दुर्गंधी आणि झाडाझुडपा मुळे रात्रीच्या वेळी साप उंदीर असे जीवास धोका निर्माण करणारे प्राणी फिरत आहेत. या परिसरात सुमारे 350 वर्षांपूर्वीचे गायत्री मंदिर आहे. त्यामुळे या भागाचा विकास प्राधान्याने व्हायला पाहिजे होता. मात्र, विकासाच्या अपेक्षेने या भागात राहण्यासाठी आलेल्या सर्व सुशिक्षित नागरिकांना हा परिसर सोडून जाण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा -भाजपाचाच उमेदवार सांगतोय 20 वर्षांत मतदारसंघात विकास रखडलाय
यासंदर्भात या प्रभागाचे नगरसेवकाकडे वारंवार निवेदने देऊन, मागणी करूनही समस्या न सुटल्यामुळे गायत्री नगरमधील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्यासाठी हिरालाल सोनी, मनोज दायमा वेदप्रकाश त्रिपाठी, रामप्रसाद बैरागी, संजय धोत्रे, ओझा, आदींची उपस्थिती होती.