जालना - शहरात गणेश विसर्जनासाठी मोतीबाग तलाव हे एकमेव ठिकाण आहे. या तलावामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाणी आहे. मात्र, बंदोबस्त गेल्या वर्षीच्या तुलनेत कडेकोट केला आहे. गतवर्षी गणेश विसर्जनादरम्यान मोती तलावातील गाळात अडकून तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने कडक उपायोजना केल्या आहेत.
लहान गणपतीचे विसर्जन मोतीबाग शेजारी असलेल्या कृत्रिम तलावात होत असून, तलावाच्या दुसऱ्या बाजूने मोठ्या गणपतींसाठी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तांनी तलावाकाठी गर्दी केली आहे. गणेशभक्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त आहे. मोठे गणपती होडीच्या माध्यमातून विसर्जित होत आहेत. तसेच क्रेनच्या साहाय्याने वाहनांमधून गणपती काढण्याची व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.