महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नोकरच निघाला चोर, जालन्यात चौघांना अटक - विशाल रामप्रसाद दाड

मालक पैसे घेऊन येणार त्यावेळी चोरी करायची अशी योजना आखत कंपनीतील नोकरानेच मालकाच्या पैशावर डल्ला मारला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवत नोरसाह चौघांना अटक केली असून आणखी दोघांचा शोध घेत आहेत.

जत्प केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक
जत्प केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक

By

Published : Feb 23, 2020, 7:12 PM IST

जालना - औद्योगिक वसाहतीमध्ये लोखंडी सळई निर्माण करणाऱ्या कंपनीच्या मालकाची रोख रक्कम लूटण्यात आली होती. या प्रकरणात चोरीसाठी साथीदारांना माहिती देऊन चोरी करण्यास मदत केलेल्या कंपनीच्याच नोकरासह अन्य तिघांना शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून 3 लाख 10 हजार 900 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, मोटार सायकल, असा एकूण 3 लाख 84 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक
नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये विशाल रामप्रसाद दाड यांची दुर्गा रोलिंग मिल नावाने लोखंडी सळई निर्माण करण्याची कंपनी आहे. या कंपनीमध्ये दाड हे नेहमीप्रमाणे बुधवारी (दि. 19 फेब्रुवारी) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नोकराला त्यांच्या मालकीच्या चारचाकीतून (क्र. एम एच 21-5901) या गाडीतून 5 लाख 80 हजार रुपये रोकड असलेली बॅग आणि जेवणाचा डबा घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान, तो नोकर गाडीतून डब्बा घेऊन येत असतानाच त्याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड मारला आणि हातातली बॅग घेऊन फरार झाले. भरदिवसा कामाच्या वेळेत औद्योगिक वसाहतीमध्ये ही घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. याची दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी परिसरातील सीसीटीव्हीचे तपासले. त्यानंतर कंपनीमध्ये चौकशी केली असता, काही कामगारांवर त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी या कामगारांची खबर्‍यांमार्फत माहिती काढली असता, याच कंपनीत काम करणारा अजय काळे कामगार संशयास्पद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आज (दि. 23 फेब्रुवारी) अजय काळे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. अजय काळे व त्याचा मित्र मयूर खांडेभराड या दोघांनी मिळून सागर डिगंबर डुकरे (रा.कीन्ही, ता. जाफराबाद, हल्ली मुक्काम शनी मंदिर जवळ जुना जालना याला दाड हे आपल्या चारचाकीतून पैसे घेऊन येत असल्याची माहिती दिली. त्यासोबत रक्कम हडप करण्यासाठी इतरही माहिती पुरविली. या माहितीच्या आधारे डुकरे याचा साथीदार तोफिक उर्फ राहील आसिफ पठाण (रा. माळीपुरा जुना जालना) व इतर दोघांनी चोरी केली.

तोफिक व सागर हे बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती शीघ्र कृती दलाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी सागर डुकरे व तोफिक या दोघांना पकडून विचारपूस केली असता, त्यांनी चोरीला गेलेल्या रकमेपैकी 3 लाख 10 हजार 900 रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, मोबाईल, लोखंडी रॉड, असा एकूण 3 लाख 84 हजार 900 रुपयांचा माल पोलिसांच्या हवाली दिला. या प्रकरणात सागर डुकरे, तोफिक पठाण, मयूर बाबासाहेब खांडेभराड आणि अजय राधाकिसन काळे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी नंदू खंदारे, ज्ञानदेव नांगरे, किरण चव्हाणसह विजय निकाळजे, आकाश कुरील यांनी ही कामगिरी केली.

हेही वाचा -वाडी बुद्रुकमध्ये संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

ABOUT THE AUTHOR

...view details