जालना -अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक जालन्यात दाखल झाले. दोघांच्या पथकामध्ये आर. पी. सिंग आणि सहारे यांचा समावेश आहे. औरंगाबादहून जालन्यात येताना त्यांनी बदनापूर तालुक्यातील तीन आणि जालना तालुक्यातील एका गावाची पाहणी केली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील त्यांनी पाहणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मोंढ्यामधील सर्व पिकांची परिस्थिती या पथकाच्या लक्षात आणून दिली.
केंद्राच्या पीक पाहणी पथकावर अर्जुन खोतकरांनी प्रतिक्रिया दिली देर आये, दुरुस्त आये -
केंद्राला उशिरा का होईना पथक पाठवण्यासाठी सवड मिळाली आहे. आलेल्या पाहणी पथकासोबत आपण स्वतः फिरून सोयाबीन, उडीद, मका, कापूस, या पिकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल माहिती दिली. या पथकाने देखील स्वतः शेतकऱ्यांकडून विस्तृत माहिती घेतली आहे. वस्तुनिष्ठ माहिती त्यांच्याकडे दिली गेली आहे. राज्याने राज्याच्या वाट्याची मदत शेतकऱ्यांना केली आहे. त्याप्रमाणे केंद्राने देखील शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अशी विनंती आपण या पथकाला केली असल्याची माहिती अर्जुनराव खोतकर यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या पथकाने केलेल्या पाहणीच्या वेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा ,जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे, आदींची उपस्थिती होती.