जालना - परदेशातून आलेल्या तरुणांचे जालना शहरातील भरवस्तीत असलेल्या हॉटेल बगडिया इंटरनॅशनलमध्ये विलगीकरण करण्यात आल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांना येथे ठेवावे आणि त्यांचे होणारे बिल वसूल करावे, असा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी या हॉटेलचे विलगीकरण केंद्र तयार केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. भर वस्तीतील हे केंद्र बंद करावे, परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासोबत होत असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी या कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
जालना शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या संभाजी नगर, मनिषनगर, म्हाडा वसाहत, श्रीकृष्णनगर या वसाहतींच्या मध्यवर्ती भागात हे हॉटेल आहे. हा पूर्णपणे रहिवासी परिसर आहे. असे असतानाही प्रशासनाने या हॉटेलमध्ये काही लोकांना विलगीकरणात ठेवले आहे. खरेतर या लोकांची घरे एवढी मोठी आहेत की, ते स्वतःच्या घरात देखील विलगीकरणात राहू शकतात. मात्र, उच्चभ्रू घरातील हे तरुण असल्यामुळे आणि हॉटेलमधील सोयी-सुविधांचा उपभोग घेतल्यानंतर देय होणारे बिलही देऊ शकत असल्याने प्रशासनाने त्यांना या ठिकाणी ठेवले आहे. काल दिनांक 13 मे रोजी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी बगडिया इंटरनॅशनल हॉटेलला पत्र देऊन हे हॉटेल उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिले आहेत.