जालना - पुर्वी भोकरदन तालुक्यात असणारे परंतु आता औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या तळेगाव वाडी येथील एका तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पाच मुलींमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. तर अन्य तीनजणी दुसऱ्या परिवारातील आहेत. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जाधव यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
दुपारी एक वाजेच्या सुमारास या मुली कपडे धुण्यासाठी या तलावावर आल्या होत्या. खरेतर तलावात पाणी काही जास्त नाही. मात्र, गाळ असल्यामुळे कदाचीत त्या आत फसल्या असाव्यात असे बोलले जात आहे. या पाच मुलींसोबत आणखी एक छोटी मुलगी होती. या पाचही मुली बुडत असल्याचे तिने पाहिले आणि गावात जाऊन माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी सदर तलावाच्या ठिकाणी येऊन या मुलींना बाहेर काढले.
फुलंब्री तालुक्यातील तळेगाव वाडी गावात पाच मुलींचा तलावात बुडून मृत्यू... हेही वाचा...लॉकडाऊन इफेक्ट; पगार कमी झालेल्या शिक्षिकेची सावकारी त्रासामुळेच आत्महत्या, सुसाईड नोटमधून उघड
पूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेले तळेगाव वाडी हे गाव आता महसूलसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात समाविष्ट केले आहे. आरोग्य आणि पोलीस यंत्रणेसाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला जोडलेले आहे आणि मतदानासाठी बदनापूर विधानसभा मतदारसंघात आहे. अशा भौगोलिक परिस्थितीतील या तळेगाव वाडी गावात अनेक वर्षांपूर्वी बनवलेला एका पाझर तलाव आहे. याच तलावात आज (मंगळवार) सात वर्षांखालील पाच मुलींचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
फुलंब्री हसनाबाद रस्त्यावर तळेगाव हे गाव आहे. या गावापासून आतमध्ये दोन किलोमीटरवर तळेगाव वाडी आहे. वाडीच्या बाजूला हा पाझर तलाव आहे. हा तलाव काल परवापर्यंत कोरडा ठाक होता. परंतु, गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे या तलावातील मोठ मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आणि तलावातील जमीन भुसभुशीत झाली. नेहमीप्रमाणे तलावाच्या बाजूला असलेल्या तळेगाव वाडी येथील या सहा मुली दुपारी दोनच्या सुमारास तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होता.
थोड्या वेळाने या मुलींपैकी पाच जणी बाजूच्या खड्ड्यांमध्ये उतरल्या आणि आणि घसरत खोल खड्ड्यातील पाण्यात गेल्या. खरेतर पाणी जास्त नव्हते. मात्र, मुली लहान असल्यामुळे त्या पाण्यामध्ये दम धरू शकल्या नाहीत. एक-एक करत पाचही मुली पाण्यात गेल्यानंतर सहाव्या मुलीने धावत जाऊन गावातील नागरिकांना याची माहिती दिली. त्यानंतर गावकरी तलावाच्या दिशेने धावले.
हेही वाचा......तर सुशांतसिंह राजपूत जीवंत असता?
प्राप्त माहितीनुसार, तिथे पोहचलेल्या गावकऱ्यांनी या सर्व मुलींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याचे लक्षात आले. मृत पावलेल्या पाच मुलींमध्ये दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्याच भावकीतील अन्य तिघींचा समावेश आहे. आशुबी लतीफ पठाण (6) नबीबाबी नवाज पठाण (6) अल्फीदाबी गौस खा पठाण (7) सानियाबी असलम पठाण (6) शबुबी असलम पठाण (5) अशी मृत पावलेल्या मुलींची नावे आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी घटना स्थळावर जाऊन पाहणी केली. मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केले आहेत. सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या तळेगाव वाडीवर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.