जालना - जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथील 17 वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर तरुणीसह दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुले असे एकूण सहा जण हे 27 एप्रिल रोजी सूरत येथून आले होते. भोकरदन हा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा गृह तालुका आहे.
सूरतहून आलेली 17 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, खासदार दानवेंच्या तालुक्यात खळबळ - corona latest update jalna
कोरोनाचा जिल्ह्यातील ग्रामीण भागातही शिरकाव होऊ लागला आहे. भोकरदन तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या तालुक्यातील ही कोरोनाची पहिलीच केस आहे.
अशी माहिती आहे की, 17 वर्षीय तरुणीसह पाचजण हे 27 एप्रिलला सकाळी धाडमार्गे पारधला आले होते. काही जागरुक नागरिकांनी दूरध्वनीवरून पारध पोलीस व ग्रामविकास अधिकारी यांना या संबंधीची माहिती दिली. या माहितीवरुन पारध पोलीस ठाण्याचे कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी यांनी तत्काळ त्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेटू घेऊन घरातील व गावातील कोणत्याही नागरिकांशी संपर्क न साधण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्या ६ जणांची माहिती जमा करून त्यांना वेगळ्या ठिकाणी स्थानबद्ध करून वलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करून त्यांना जालना येथे पाठवण्यात आले. आज (गुरुवार) त्या सहा जणांपैकी 17 वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पारधमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे सहाहीजण पारध येथे येताना कोणकोणत्या लोकांच्या संपर्कात आले तसेच गावातील व त्यांच्या परिवारातील अन्य किती लोकांच्या संपर्कात आले हे मात्र गुलदस्त्यात आहे.