जालना -सामान्य रुग्णालयाच्या कोविड विभागातून 2 रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री साडेदहा वाजता संबंधित परिचारिकेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल -
कंत्राटी अधिपरिचारिका रिमा देविदास निर्मळ यांनी या दुपारी एक वाजता ड्युटीवर आल्या होत्या. सकाळच्या सत्रात असलेल्या अधिपरीचारिका सरिता पाटोळे यांच्याकडून त्यांनी रुग्णांची माहिती घेतली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोविड रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची माहिती घेत असताना सरिता यांनी त्यांना 11 इंजेक्शन असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी टेबलवर तपासणी केली असता, 11 पैकी 2 इंजेक्शन कमी निघाले. याविषयी त्यांनी परीसेविका अनिता जॉन चव्हाण यांना माहिती दिली. इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र, ते इंजेक्शन दिसून आले नाही. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार त्यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिली.
हेही वाचा - 'नवाब मलिक यांनी कमी बोलावे, त्यांच्या अडचणी कमी होतील'