जालना - शहरातील कदीम पोलीस ठाण्यात तीन तलाकविरोधातील गुन्हा दाखल करण्यात आला. भोईपुरा जाफर चाळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली.
जालन्यात तीन तलाकविरोधात गुन्हा दाखल
जालन्यात तीन तलाकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २६ वर्षीय महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवली होती.
संबंधित महिला सध्या औरंगाबादेतील जहागीर कॉलनीमध्ये राहते. गेल्या ९ मार्च २०११ ला जालन्यातील भोईपुरा जाफर येथे राहणाऱ्या नवाब खाँ चांद खाँ पठाण यांच्यासोबत मुस्लीम समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे तिचा विवाह झाला. त्यानंतर २०१४ पर्यंत सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर तिचा पती नवाब खाँ चांद खाँ याला त्याच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी तिच्याविरोधात भडकवले. त्यांनी माहेरून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करण्यासाठी ३ लाख रुपये घेऊन यावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या छळामध्ये पतीचे नातेवाईक फिरोज खाँ चांद खाँ पठाण, मुमताज चांद खाँ पठाण, कौसर बानो फारुख पठाण, जतीन सय्यद शमीम सय्यद यांचा समावेश आहे.
विवाहितेची घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ती ही रक्कम देऊ शकली नाही. त्यामुळे पतीने 2017 मध्ये विवाहितेला औरंगाबादला पाठवून दिले. त्यानंतर नातेवाईकांनी पतीची समजूत काढली. मात्र, ते समजण्याच्या पलीकडे गेले होते. त्यामुळे दिनांक 3 ऑक्टोबर 2019 ला संबंधित विवाहिता जालना येथील नवऱ्याच्या घरी आली. मात्र, नवऱ्याने तिला घरात न घेता तीन वेळा तलाक, तलाक, तलाक, असे म्हटले आणि तलाक दिल्याचे सांगितले. याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी विवाहितेचा छळ करण्याच्या कलमांसह तीन तलाक विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.