जालना - मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या सोयाबीन, मूग, उडीद, भात आणि कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाने काढणीच्या कामात व्यत्यय येत असून, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
बळीराजाने खरीप हंगामासाठी कसेबसे कर्ज घेऊन पिकांची लागवड केली. त्यानंतर त्याने दिवस-रात्र करून ती पिके जगवली. आता काढणीचा हंगाम सुरू आहे. अशात परतीचा पाऊस सुरू झाला. यामुळे खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. वाकडी परिसरातील कुकडी, वाडी, पळसखेडा बेचिराग, मनापुर, मलकापूर, तळणी आदी गावांसह भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने सुरू असलेल्या पावसाने कापूस झाडावरच खराब होत आहे.