जालना- जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील खंडाळा, पिंपळगाव कोलते-तळेगाव परिसरात लांडग्याने तीन शेतकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी औरगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खंडाळा परिसरात आपल्या शेतामध्ये काम करत असताना समोरून आलेल्या लांडग्याने शेतकरी पराजी सोनोने, काकाराव सोनोने या शेत मजुरांवर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. तर शेतामध्ये बांधलेल्या 4 जनावरांवरही हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
हेही वाचा - बदनापूरच्या डोंगरगाव येथे वाळूची चोरटी वाहतूक ; सुमारे 85 लाखांचा मुद्देमाल जप्त
तसेच पिंपळगाव कोलते-तळेगाव परिसरात शनिवारी (दि. 8 फेब्रुवारी) सकाळी शेतात गव्हाला पाणी देणार्या कौतिक सोळुंके या शेतकर्यावर लांडग्याने हल्ला चढविला त्यानंतर टॉवरचे काम करणारा मजूर मंजरा मुरमुकर यांच्यावरही या लांडग्याने हल्ला चढवून दोघांनाही गंभीर जखमी केले आहे. लांडग्याच्या हल्ल्यामुळे या परिसरात शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.