जालना -राज्य शासनाच्या "विकेल ते पिकेल" या धोरणाचा जालन्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. येथील शेतकऱ्यांनी थेट दिल्लीची बाजारपेठ गाठली. चांगला आणि गुणवत्तापूर्ण शेतीमाल असूनही शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत योग्य भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन बाजारपेठेची शोधाशोध सुरू केली आहे. जालन्याच्या शेतकऱ्यांनी दिल्लीला सीताफळे पाठवून जालना शहरात मिळणाऱ्या भावापेक्षा चौपट भाव मिळवला आहे. यामधून एक हिस्सा खर्च केला तर जालन्याच्या तुलनेत शेतकरी तिप्पट नफा कमवीत आहेत. याचाच एक भाग म्हणून साडेपाच टन सीताफळ दिल्लीकडे गुरूवारी रवाना झाले आहेत.
जालन्यात 40 रुपये दिल्लीत 120 रुपये किलो सीताफळ
सीताफळ उत्पादन आणि विक्री संदर्भात सीताफळाचे उत्पादक गणेश पडुळ यांनी सांगितले की, ज्या सीताफळाला जालन्यात 20 ते 40 रुपये किलोने मागणी आहे. तेच सीताफळे दिल्लीच्या बाजारात 100 ते 120 रुपये किलो प्रमाणे जातात. सीताफळे दिल्लीला पाठवण्यासाठी एका किलोला 17 ते 20 रुपये खर्च येतो. त्या अनुषंगाने इथे 40 रुपये किलो विकली जाणारी सीताफळे दिल्लीला जर 120 रुपये किलोने जात असतील, तर वीस रुपये खर्च वजा जाता किलोमागे 60 ते 70 रुपये जास्तीचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता योग्य बाजारपेठ शोधून तिथेच आपला माल विकला पाहिजे.
किती दिवस टिकतात सीताफळे-
सीताफळामध्ये विविध प्रकार आहेत. या प्रकारापैकी काही प्रकार हे सीताफळाचे डोळे उघडल्यानंतर वातावरणात थंडी नसेल तर 2 ते 3 दिवसात नरम पडतात. त्यामुळे अशी सीताफळे जालना येथून दिल्लीला पोहोचेपर्यंत नरम होतात. मात्र याच वातावरणामध्ये बळीराजा गोल्डन या प्रकाराची सीताफळे सहा ते आठ दिवस नरम होत नाहीत. त्यामुळे जालन्याहून दिल्लीला गेल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस व्यापाऱ्यांना ही सीताफळ ग्राहकापर्यंत पोहोचविता येतात. त्यामुळे या सीताफळांना दिल्लीमध्ये चांगली मागणी आहे.
थंडी वाढली तर जानेवारीपर्यंत सीताफळे-
दिवाळीपासून वातावरणात गर्मी आहे. त्यामुळे फळधारणा झाली तरी ते गळून पडत आहे. मात्र थंडीचे प्रमाण वाढल्यास हा सीताफळाचा हंगाम सहा महिने चालू शकतो. जूनमध्ये फळधारणा सुरू झाली. वातावरणात थंडी वाढली तर जानेवारीपर्यंत सीताफळ खायला मिळू शकतात.