जालना -भोकरदन तालुक्यातील पेरजापूर येथील देविदास भगवान तळेकर (वय 40) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तळेकर यांनी विविध बँकांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जांच्या धास्तीपोटी मंगळवारी दुपारी शेतामध्ये विषारी औषध घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे कर्जामुळेच आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
शेतकरी देविदास तळेकर हे पॅसेंजर रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांचा रिक्षा व्यवसायदेखील बंद होता. तळेकर यांना एक एकर जमीन असून गेल्या काही दिवसांपासून ताणतणावात असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता ते कोणालाही न सांगता घरातून निघून गेले आणि सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. सायंकाळी देविदास तळेकर यांची पत्नी व मुलगा योगेश घरी आल्यानंतर सात वाजेपर्यंत ते घरी आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र,रात्री उशिरापर्यंत ते सापडले नाहीत.