जालना- कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून नागरिकांनी साबणाने, सॅनिटायझरने हात धुवावे असे सांगितले जात आहे. त्यामुळे अचानक सॅनिटायझरच्या मागणीत वाढ झाल्याने बाजारात तुटवडा निर्मान झाला. त्याचा फायदा घेत बाजारात बनावट सॅनिटायझरने धुमाकुळ घातला. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून गुरूवारी शहरातील ठोक विक्रेते 'कल्पना एम्पोरियम' या दुकानावर धाड टाकून मोठा साठा जप्त केला.
जालन्यात बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त... हेही वाचा-निर्भया प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने दोषी विनय गुप्ताची याचिका फेटाळली
अन्न आणि औषध प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांनी संयुक्त धाड टाकून बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त केला. तसेच लपवून ठेवलेला मास्कचा साठाही जप्त केला आहे. गुरुवारी पाच वाजेच्या सुमारास धाड टाकण्यास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसय्ये, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, यांचा या कारवाईत सहभाग होता.
दरम्यान, या भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे कारवाई करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. पोलिसांनी दुकान ताब्यात घेतल्यानंतर सर्वप्रथम सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फूटेजमध्ये दुकानाच्या एका कोपऱ्यात बनावट सॅनिटायझर आणि मास्क साठा दडवून ठेवल्याचे आढळले.
भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांचे हे प्रतिष्ठान आहे. त्याच सोबत भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीचे देखील येथे कार्यालय आहे.