महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदनापूर तालुक्यात तूर पिक जोमात, मात्र अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता

खरीपात लागवड केलेल्या तुरीच्या पिकांची मात्र उत्तम वाढ झाली असून सध्या तुरीच्या शेतात कळी व फुलांनी पिवळा शालू पांघरला असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे. तुरीचे पिक बघता उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

jalna badnapur tur crop news
बदनापूर तुरी पिक

By

Published : Nov 26, 2020, 11:03 AM IST

बदनापूर (जालना) -पाच वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यावर्षी अतिवृष्टीने तालुक्याला झोडपल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन मिळाले नाही. तरीही खरीपात लागवड केलेल्या तुरीच्या पिकांची मात्र उत्तम वाढ झाली असून सध्या तुरीच्या शेतात कळी व फुलांनी पिवळा शालू पांघरला असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे. तुरीचे पिक बघता उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
यावर्षी वादळी वाऱ्यासह परतीचा पाऊस देखील जोरदार बरसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली खरीपांची पिके पावसामुळे गेली. खरीपातील सोयाबीन, मका, उडीद, मूग, बाजरी ही नगदी पैसा देणारी पिके हातातून गेली. सोयाबिन व मका सोंगणीच्या काळातच ऐन पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
तूर चांगली मात्र अळ्यांचा प्रादुर्भाव

सर्व खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना तूर मात्र चांगली बहरली आहे. मात्र, तालुक्यातील काही भागात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी औषधी फवारणी करताना दिसत आहेत. विशेष म्हणून कोरडवाहू क्षेत्रातील तुरीलाही परतीच्या पावसाचा चांगलाच फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना या पिकांतून मोठे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. बदनापूर तालुक्यातील पाडळी येथे सिध्देश शेळके या तरुण शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रात तुरीची लागवड केली आहे. यावर्षी खरीप पिकांमध्ये तूर हे पिक उत्कृष्ट आलेले असून कापसाच्या तुलनेत तुरीला खर्च कमी असून यावर्षी तरी उत्पादन वाढणार असे सिद्धेश यांनी सांगितले.
अळी रोखण्यासाठी कोणती औषधे वापरावीत

सध्या तूर पीक जोमात असले तरी ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर निंबोळी अर्क पाच टक्के, अझाडिरॅकटीन ३०० पीपीएम, ५० मिली दहा लिटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करावी तसेच शेंगा पोखरणारी अळी आढळल्यास इमामेक्टीन बन्झोऐट पाच टक्के एसजी हे कीटकनाशक ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला बदनापूर येथील कृषी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

हेही वाचा -लोअर परेल येथील सनमिल कंपाऊंड येथील एका बंद दुकानाला आग

हेही वाचा -मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मुंबई-पुण्याचे असल्याने विदर्भावर अन्याय - चंद्रशेखर बावनकुळे

ABOUT THE AUTHOR

...view details