जालना - सातवा वेतन आयोग लागून दोन वर्ष झाली. मात्र, या फरकाची रक्कम आजपर्यंत सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. यासंदर्भात त्यांनी सेवानिवृत्त पोलिसांनी अधिक्षक एस. चैतन्य यांची भेट घेऊन ही कैफियत मांडली. मात्र, त्यांच्यासमोर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवसांत काम करतो म्हणून वेळ मारून नेली. दोन महिने होत आले तरीदेखील काहीच काम झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत आपली कैफियत मांडली.
जिल्ह्यातील गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये अनेक पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले. 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग आयोगानुसार फरकाची रक्कम देणे बाकी आहे. ही रक्कम मिळावी म्हणून या कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना 8 आणि 9 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेटून फरकाची रक्कम देण्याची मागणी केली. दोन्ही वेळी या कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक बोर्डे यांनी पोलीस अधीक्षकांसमोर या सेवानिवृत्त यांचे पंधरा दिवसात काम करतो, असे आश्वासन दिले. मात्र, आजपर्यंत फरकाची रक्म आली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची पुन्हा भेट घेतली आणि काम करण्याची विनंती केली. दरम्यान, हे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे वयोमानानुसार परिवाराचा आणि त्यांचा स्वतःच्या इलाजासाठी खर्च करावा लागतो. त्यासाठी ही हक्काची रक्कम मिळणे गरजेचे असल्याचेही ते म्हणत आहेत.