जालना - सामान्य रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शासनाकडून तीन वर्षांपूर्वीच 12 लाख रुपये देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, काही ना काही कारणे सांगून हे काम टाळले जात होते. यासंदर्भात ईटीव्ही भारतने सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा भोंगळ कारभार उघडकीस आणला होता.
याची दखल घेत पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 24 जानेवारीला हे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने फेब्रुवारीमध्ये हे कामही सुरू केले होते. मात्र, फक्त दगड आणून टाकले आणि पुन्हा काम बंद पडले. या फोडलेल्या दगडांमुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे हे काम म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असे झाले होते.