जालना -लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यास आज २८ तारखेला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी आणि पहिलाच अर्ज नवरदेवाने भरून जालना लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची बोहनी केली. जालना तालुक्यातील धारकल्याण येथील शेतकरी कुटुंबातील सुदाम श्रीमंत इंगोले असे या उमेदवाराचे नाव आहे.
सुदाम इंगोले यांचा आज सायंकाळी ६:४५ वाजता बदनापूर तालुक्यातील उज्जैन्पुरी या गावच्या रामदास काळे यांची मुलगी शितल उर्फ भाग्यश्री हिच्यासोबत विवाह संपन्न होणार आहे. तत्पूर्वी धार कल्याणहून उज्जैनपूरीकडे जाताना दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी सुदाम इंगोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मित्रांसह व काही वराडी मंडळींसह आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
नवरदेवाने केली लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याची बोहनी - निवडणुक
सुदाम इंगोले यांचा आज सायंकाळी ६:४५ वाजता उज्जैन्पुरी गावच्या रामदास काळे यांची मुलगी शितल उर्फ भाग्यश्री हिच्यासोबत विवाह संपन्न होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मित्रांसह व काही वराडी मंडळींसह आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
अपक्ष म्हणून जरी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी आपल्यावर बच्चू कडू यांचा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून बच्चू कडू यांच्या विचारांपासून आपण प्रेरणा घेतली आहे. त्या पद्धतीने आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले, शेतकऱ्यांना साला म्हणून हिनविणाऱ्या खासदार दानवेंना आपण प्रतिस्पर्धी मानत असून त्यांच्या विरोधातील तापलेल्या वातावरणामुळे आणि शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास इंगोले यांनी व्यक्त केला आहे. सुदाम इंगोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापूर्वी न्यायालयातून त्यांचे वकील अडवोकेट कुलकर्णी यांना सोबत घेतले आणि काही वराडी मंडळींसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र, प्रवेशद्वारावरच पोलीस यंत्रणेने वराडीना अडवून शिष्टमंडळाला आत मध्ये सोडले. त्यानंतरही ही परत एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करताना परत एकदा अडवले गेले. पाच व्यक्तींना जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनात सोडण्यात आले. त्यामुळे नवरदेवाचा थाट पाहण्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींची मात्र निराशा झाली.
लोकसभेच्या उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी पहिलाच उमेदवार आणि तोही नवरदेव. यामुळे लोकसभेची बोहनी नवरदेवने अर्ज भरून सुरू केल्यामुळे निवडणुकीत चांगलेच रंग भरले जातील, अशी चर्चा सुरू आहे.