जालना -गोंदी येथील गोदावरी शिक्षण संस्थेच्या तीन शाळा आहेत. एक जालना येथे अक्रम फातेमा माध्यमिक कन्या शाळा, दुसरी गोंदी येथे आणि तिसरी रावणापराडा येथे आहेत. दरम्यान जालना येथील आक्रम फातेमा माध्यमिक कन्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून अनागोंदी कारभार आहे. यासंदर्भातील वारंवार झालेल्या चौकशा आणि त्यातून शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी बस्त्यात बांधून ठेवले आहेत. आता संस्थेमधील गैरप्रकार लपविण्याचाच्या पलीकडे गेल्यामुळे त्रस्त झालेल्या एका माजी प्रभारी मुख्याध्यापिकेने या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण -
जालना शहरातील कुचरओटा भागात गोदावरी शिक्षण संस्थेची आक्रम फातेमा माध्यमिक कन्या शाळा आहे. या शाळेत 23 वर्षांपूर्वी द्रोपदी रामभाऊ लोखंडे(52) शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आणि त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार त्या मुख्याध्यापक पदासाठी पात्र ठरल्या. मात्र, संस्थाचालकांना या शिक्षिकेला मुख्याध्यापक होऊ द्यायचे नव्हते, म्हणून वारंवार त्यांच्या तक्रारी करणे, शिस्तभंगाची कारवाई करणे, त्यांच्यावर बहिष्कार टाकने, त्यांची बदनामी करणे, असा ससेमिरा त्यांच्या मागे लावला. शेवटी त्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तसेच त्या जागी या संस्थाचालकाच्या पत्नीला नियुक्ती देण्यात आली. खरेतर ही नियुक्ती देत असताना लोखंडे यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. मात्र, ते न दिल्यामुळे त्यांना आणखीनच त्रास आला देण्यात आला.
अहवालावर शिक्षणाधिकाऱ्यांचे मौन -
या शाळेची चौकशी करण्यासाठी 22 नोव्हेंबर 2019 रोजी घनसांगी, बदनापूर आणि जालना या तिन्ही पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जालना येथील अक्रम फातेमा माध्यमिक कन्या शाळेत सकाळी 10 वाजता भेट दिली. यावेळी त्यांनी 46 मुद्द्यांवर चौकशी केली. त्यानुसार गटशिक्षणअधिकार्यांनी 5 डिसेंबर 2019 रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना अहवालही सादर केला होता. या अहवालानुसार त्यांनी त्रुटी असल्याचेही म्हटले होते. तसेच या शाळेमध्ये संस्थेतर्फे समीना पटेल यांना प्रभारी मुख्याध्यापक नेमण्याचे सांगण्यात आले. परंतु त्यांनी संस्था नेमणूक आदेश दाखवला नाही. तसेच वेतनावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार सहशिक्षक आर.पी. लटके यांना दिल्याचे सांगितले. परंतु मान्यता आदेश दाखविला नाही. या त्रुटीसह शाळेमध्ये किचन शेड आढळले नाही. शाळेमध्ये पोषण आहार दिला जातो; परंतु हा कधी दिला जातो, याबद्दल कुठलीही लेखे उपलब्ध नाहीत. विद्यार्थ्यांना अंडी, केळी, दूध-बिस्किट, शेंगदाणे वाटप करण्यात येत नाही. विद्यार्थी उपस्थिती कमी आढळून आली. मदतनीस म्हणून तसलीम नसीर शेख यांची तर स्वयंपाकी म्हणून सुनिता अंकुश चव्हाण यांची नियुक्ती आहे. 1996 ते 2000 या कालावधीत अभिलेखे, शिक्षक हजेरी पट, संचमान्यता, विद्यार्थी हजेरीपट, मुख्याध्यापकांकडे उपलब्ध नव्हते. अशा प्रकारचा अहवाल या तिन्ही गटशिक्षणाधिकारी यांनी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिला. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई या संस्थेवर झालेली नाही.
संस्थेच्या कार्यकारी मंडळासह अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल-
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतरदेखील न्यायालयाने यासंदर्भातील सुनावणी शिक्षणाधिकाऱ्यांना घेण्यास सांगितले. त्यावेळीदेखील कुठलेही मूळ कागदपत्र शिक्षणाधिकाऱ्यांना दाखविण्यात आले नाहीत. असे असतानाही शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थाचालकांना पाठीशी घातले आहे, हे उघड झाले आहे. त्यामुळे 23 वर्ष सेवा केलेल्या द्रोपदी रामभाऊ लोखंडे या माजी प्रभारी मुख्याध्यापिकेने शेवटी या संस्थेचे मुख्यालय असलेल्या गोंदी तेथे 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार समीना पटेल, संध्या परसराम पवार, रावसाहेब पुंडलीक लटके, श्रीकृष्ण शेषराव चेके, युसुफ नसीर इनामदार, अब्रार सोहेल ताहीर मिया सौदागर, ताहेरमिया वजीर मिया सौदागर, साहिरा रूही सौदागर या आठ जणांसह 2003 पासून या संस्थेचे जे कार्यकारी मंडळ कार्यरत होते, त्या सर्वांवर कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संस्थाचालकांनी संस्थेतील अनेक शिक्षकांना त्रास देत आपल्या घरातील सदस्यांनाच संस्थेत मुख्याध्यापकपदी आणि अन्य पदांवर नियुक्त केले आहे.
हेही वाचा - मुंबई : 12 कोटींच्या 25 किलो एमडी या अमली पदार्थासह आरोपीला अटक