जालना - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी अधिग्रहित केलेल्या इमारतीमध्ये रुग्णांना झालेल्या गैरसोयीला जबाबदार धरून जालना येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य सी.एस. थोरात यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
जालन्यात तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापनाचा गुन्हा दाखल - कोरोना ताजी बातमी जालना
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकरता अधिग्रहीत केलेल्या इमारतींमध्ये सुविधांचा अभाव असल्याची तक्रार रुग्णांनी केली होती. या गैरसोयीला धरून जालना येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्याचे तहसीलदार भुजबळ यांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य सी.एस. थोरात यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
औरंगाबाद महामार्गावर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या परिसरात असलेले मुलींचे वसतिगृह सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यासाठी अधिगृहीत करण्यात आले आहे. तिथे सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी नोडल अधिकारी म्हणून या महाविद्यालयाचे प्राचार्य सी. एस. थोरात यांच्याकडे देण्यात आलेली आहे. इथे असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी त्यांच्यासाठी विजेची व्यवस्था नसणे, शौचालय स्वच्छ नसणे, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने नायब तहसीलदार राजमाने यांनी 22 जुलैरोजी या ठिकाणची पाहणी केली आणि संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या. मात्र, तरीदेखील यामध्ये काहीच फरक पडला नाही.
प्राचार्य थोरात यांनी स्वच्छतेची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला समज देऊन ही कामे करून घेणे आवश्यक होते. मात्र, तसे काही केले नाही आणि तो कंत्राटदार प्रतिसाद देत नसल्याचे शासनालाही कळविले नाही. त्यातच वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यामुळे प्राचार्य थोरात यांनी नोडल ऑफिसर म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्याचीही मागणी केली आणि इतर दोन कर्मचाऱ्यांवर हे जबाबदारी सोपवून प्रशासनाची दिशाभूल केली आहे. या आरोपावरून जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी चंदंनजिरा पोलीस ठाण्यामध्ये 27 जुलैरोजी प्राचार्य सी.ए. थोरात यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने थोरात यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.