जालना - गणपती म्हटले की संकष्टी चतुर्थी हा दिवस महत्त्वाचा. म्हणूनच या दिवशी भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनाला भक्तांची गर्दी असते. मात्र, आज चतुर्थीला या भव्यदिव्य मंदिरात शुकशुकाट आहे. मंदिर बंद असल्याने भाविकांविना परिसर सुना-सुना आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून मंदिर बंद आहे. प्रचंड मोठा गाभारा, सोनेरी कळस आणि सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये पांढरे शुभ्र चमकणारे संगमरवर, हे या मंदिराचे आकर्षण आहे. भाविक गणपतीच्या दर्शनासाठी तर येतातच, मात्र मंदिराची आकर्षक वास्तूही मन प्रसन्न करते. अन्य वेळी गर्दी कमी असली, तरी चतुर्थीला मात्र भाविकांची प्रचंड गर्दी असते. आज चतुर्थी असली तरी, भाविकांना गाभार्यापर्यंत प्रवेश नाही. मात्र, मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पहिल्याच पायरीवर भाविक माथा टेकवत दर्शन घेत आहेत.