जळगाव - आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता केवळ चर्चा करणारा देश राहिलेला नाही. तर अमेरिका आणि इस्त्राईल या देशांच्या पाठोपाठ शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणारा बलवान देश झाला आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव येथील जाहीर प्रचार सभेत केले.
काँग्रेसचा ‘गरिबी हटाव’चा नारा म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असल्याची घणाघाती टीकादेखील त्यांनी यावेळी केली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ जळगावात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, उमेदवार उन्मेश पाटील, माजीमंत्री सुरेश जैन, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, चंदुलाल पटेल, स्मिता वाघ, उपमहापौर अश्विन सोनवणे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर काँग्रेसचे नेते भाषणातून केवळ मोदींवर टीका करीत आहेत. त्यांना रात्री मोदींजीचे स्वप्न पडत आहे. ते रात्री अचानकपणे झोपेतून उठून मोदी-मोदी करत असतील. या निवडणुकीने त्यांची झोप उडवली आहे. ही निवडणूक साधी नव्हे, तर देशाच्या सुरक्षिततेसाठीची निवडणूक आहे. पाकिस्तानने आतंकवादी पाठवून भारतावर हल्ले केले. त्यावेळी काँग्रेस सरकारने चर्चेशिवाय काहीच केले नाही. पाकिस्तानात घुसून मारण्याची ताकद फक्त मोदी यांच्यातच आहे. भारत आता चर्चा करणारा नाही, तर शत्रूला घरात घुसून मारणारा देश आहे. पाकिस्तानात झालेल्या सर्जिकल तसेच एअर स्ट्राईकमुळे भारत बलशाली राष्ट्र असल्याचा संदेश जगात गेला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मागील सरकारची भ्रष्ट संस्कृती संपविण्याचे काम मोदींनी केले. 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी संकल्पना मोदी सरकारने राबवली असून दिलेल्या प्रत्येक योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात मिळत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला थारा उरला नाही, असे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती दिली. जळगाव शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हुडकोचे महापालिकेवरील कर्ज संपविण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले.
आमचे तर लव्ह मॅरेज, तुमचे काय
आपल्या शैलीदार भाषणाने ओळखले जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, शिवसेना-भाजपसोबत फरफटत गेल्याची टीका आमच्यावर आघाडीकडून केली जाते. भाजप-सेना म्हणजे आमचे तर लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे आमच्यात सतत वाद होतात. पण आम्ही एकत्र येतोच. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचे तर साधे लफडेही नाही. मग तुम्ही कशाला एकमेकांचे मुके घेता? अशा शब्दात पाटील यांनी आघाडीची टर उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटलेल्या गुंडाची टोळी असल्याची सणसणीत टीकाही त्यांनी यावेळी केली.