जालना -दिवाळीपूर्वी परतीच्या पावसामुळे कापसाचे भरपूर नुकसान झाले. कपाशीचे नवीन पाते गळून गेले व परतीच्या पावसात कापूसही भिजला. त्यामुळे कापूस उत्पादन अत्यल्प होणार होते. शेतकऱ्याला बाजार नियमानुसार कापसाला चांगला भाव मिळणे अपेक्षीत असताना खासगी व्यापाऱ्यांनी मात्र शेतकऱ्यांची लूटच केली. यामळे बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करुन हमीभावाने कापूस खरेदी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - नुकसानीची रक्कम सरकारलाच मनीऑर्डर करणार, अपुऱ्या मदतीबाबत शेतकऱ्याची उद्विग्न भावना
परतीच्या पावसाने बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांची प्रचंड नासाडी झालेली आहे. नगदी पीक विकून ऐन दिवाळीच्या तोंडावर चांगले पैसे मिळतात म्हणून तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करण्यात येते. यंदा मात्र दिवाळीच्या आधीच फुटलेला कापूस वेचण्यापूर्वीच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले. तर वेचणीला आलेला कापूस तसाच राहिला त्यानंतर जास्त पाण्यामुळे ही झाडे काळवंडून किंवा लाल होऊन पाते गळू लागली. त्यामुळे नवीन कैऱ्या लागण्याची कोणतीही शक्यता नाही. तसेच उत्पादनातही अर्ध्यापेक्षा जास्त घट दिसून येत आहे.