भोकरदन (जालना)- तालुक्यातील पद्मावती आणि मासरुळ येथील शेतकरी, मजुरांना आजही पोटाची खळगी भरण्यासाठी तराफ्यातून अडीच किमी प्रवास करावा लागतो आहे. प्रवास करताना मजुरांकडे कोणतेही सुरक्षेचे साधन नसते. मात्र पोटासाठी येथील मजूर जिवघेणा प्रवास करतात.
जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध हद्दीत पद्मावती धरणाला लागून असलेले मासरुळ गाव विदर्भाच्या हद्दीत अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर आहे. या दोन्ही गावाच्या मध्यात पद्मावती धरण आहे. हे धरण सध्या जवळजवळ ७० ते ७५ टक्के पाणीसाठ्याने तुडुंब भरले आहे.
रस्त्या अभावी शेतकरी, मजुरांचा तराफातून जीवघेणा प्रवास.. दरम्यान, गावाशेजारील मंदिरे हे काही पाण्यात डुबली आहेत. पद्मावती येथील काही शेतकऱ्यांची जमीन म्हासरुळ शिवारात आहे. या धरणात पाणी असल्याने येथील शेतकऱ्यांना शेती करणे अवघड जाते. मजुंराना व शेतकऱ्यांना अडीच किमी पाणी ओलांडून शेतात जावे लागते. यासाठी मजूर व शेतकऱ्यांना दररोज तराफ्यावर जीवघेणा प्रवास करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असल्याने एखाद्या वेळी मोठी दुर्घटना देखील घडू शकते, अशी भीती येथील मजूर व्यक्त करतात.
या भागातील शेतकऱ्यांनी 20 ते 25 हजार रुपये लोकवर्गणी जमा करुन तराफा तयार केला आहे. त्यातुनच मजुरांची ने-आण होते. सध्या कोरोनामुळे शांळाना सुट्टी असल्याने लहान मुले देखील याच तराफ्यातून प्रवास करत आहेत. जोपर्यंत धरणातील पाणी ओसरत नाही तोपर्यंत असाच जिवघेणा प्रवास येथील मजूर व शेतकऱ्यांना करावा लागतो.
आमची शेती धरणापलीकडे म्हासरुळ शिवारात आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता, पूल नसल्याने आम्हाला मजूर तसेच शेती साहित्य ने-आण करण्यासाठी तराफ्याचा वापर करावा लागतो, असे येथील शेतकरी सांगतात.