जालना -बुधवारी सायंकाळी पिंपळगाव रेणुकाई परिसरात झालेल्या जोरदार पावासात भोकरदन तालुक्यातील अवघडराव सांवगी येथील नदीला पूर आला होता. या पुरात वाहुन गेलेला तरुणाचा मृतदेह हा तब्बल 39 तासानतंर गावजवळच गाळात फसलेल्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांना शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास हा मृतदेह दिसला.
पुराच्या पाण्यात चालण्याचे केले धाडस -
तालुक्यातील अवघडराव सांवगी येथील सलीम सय्यद व शाहेद सय्यद हे दोन चुलतभाऊ धाड या गावातून काम आटोपून घराकडे निघाले होते. मात्र, बुधवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गावाजवळील नदीला पूर आला होता. दोन्ही तरुणांनी मागे पुढे न पाहता थेट पुरातील पाण्यातुन पायी चालण्याचे धाडस केले. पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्याच्या वेगात दोघेही खाली पडले. यावेळी ग्रामस्थांनी धाव घेत सलीम सय्यदला बाबुंचा आधार देत कसेबसे बाहेर काढले. मात्र, शाहेद हा पाण्याच्या वेगाने पुरात वाहुन गेला. तेव्हापासून शाहेदला शोधण्यासाठी अख्खे गाव तसेच प्रशासकीय यंञणा युद्धपातळीवर कामाला लागली होती.
हेही वाचा -पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; कोकण किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम
गुरूवारी सायंकाळपर्यंत सर्वत्र शोध घेऊनही शाहेदचा मृतदेह सापडला नसल्याने सर्वांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे नातेवाईक व आई-वडील यांची आणखीच चिंता वाढली होती. शुक्रवारी पुन्हा ग्रामस्थांनी सकाळीच शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान, शाहेदचा मृतदेह गावापासुन हाकेच्या अतंरावरच एका खड्यात गाळात फसलेला आढळून आला. यावेळी महसुलच्या पथकाने पंचनामा केला. यानंतर सकाळी दहा वाजता शाहेदवर अंतिम संस्कार करण्यात आले.