बदनापूर (जालना) -तालुक्यातील महत्त्वाचे सोमठाणा दुधना मध्यम प्रकल्प, वाल्हा येथील धरण या दोन्ही धरणामधील अंतर अडीच किलोमीटर आहे. सोमठाणा धरणातील पाणी वाया जात असताना वाल्हा धरणात पाणी नसते. यामुळे दोन्ही धरणाची जोडणी करण्याची योजना २०१६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी रंगानायक आणि तत्कालीन तहसीलदार बालाजी क्षिरसागर यांनी आखून तसा प्रस्ताव जालना लघु पाटबांधारे कार्यालयास पाठविला होता. परंतु दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर प्रस्तावामधील त्रुटींची पूर्तता न झाल्याने व सदर कार्यालयाने प्रस्ताव शासनास न पाठविल्याने धूळ खात पडला आहे. सदर प्रश्न मार्गी लागल्यास तालुक्यातील पाणीटंचाई सह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्ठात येणार आहे. सद्यघडीला राजेवाडी येथील प्रकल्प भरून वाहत आहे. तर सोमठाणा धरणही तुडुंब भरलेले आहे. असे असताना वाल्हा धरणात मात्र 55 टक्केच पाणीसाठा आहे. यामुळे हे धरणजोड होणे किती गरजेचे आहे हे दिसून येते.
बदनापूर तालुक्यातील धरण जोड प्रस्ताव धूळखात - badnapur dam project
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा दुधना मध्यम प्रकल्प आणि वाल्हा येथील धरण या दोन धरणाचा जोड प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर प्रस्तावामधील त्रुटींची पूर्तता न झाल्याने व सदर कार्यालयाने प्रस्ताव शासनास न पाठविल्याने धूळ खात पडला आहे.
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे मध्यम प्रकल्प असून नोव्हेंबर २०१५ मध्ये दोन दिवसात धरण तुडुंब पाण्याने भरून ओसंडून वाहत होते. तर अडीच किलोमीटर अंतरावर असलेले वाल्हा लघु सिंचन धरण व तीन किलोमीटर अंतरावर असलेले राजेवाडी धरणात ५० टक्के पाणी आले होते. सोमठाणा धरण भरल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात होते. दरम्यान जिल्हाधिकारी रंगानायक यांनी सोमठाणा धरणास भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जमा झालेल्या शेतकऱ्यांनी सोमठाणा व वाल्हा धरणातील अंतर खूप कमी असल्याने या दोन्ही धरणाची जोडणी केल्यास वाया जाणारे पाणी वाल्हा धरणात साठविल्यास भविष्यात देखील दोन्ही धरणात पाणीसाठा उपलब्ध राहील. त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करता येईल, अशी संकल्पना मांडली. यावर जिल्हाधिकाऱ्यानी तातडीने प्रस्ताव बनविण्याचे आदेश तत्कालीन तहसीलदार बालाजी क्षिरसागर यांना दिले होते. २०१६ मध्ये शासनास प्रस्ताव पाठविण्यात आल्याने शासनाने कार्यकारी अभियंता पाटबंधारे यांना आदेश देऊन प्रस्तावसाठी आवश्यक माहिती मागितली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी मोघम स्वरूपाची व अपूर्ण माहिती दिल्याने प्रस्ताव धूळखात पडलेला आहे.
सोमठाणा, वाल्हा व राजेवाडी धरणाची जोडणी करण्यासाठी प्रस्तावात आलेल्या अडचणीच्या अनुषगाने कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये कार्यकारी अभियंता पाटबंधारे जालना यांना पत्र देऊन माहिती मागितली होती. परंतु या कार्यालयाने २९ जानेवारी २०१८ रोजी अपूर्ण व मोघम स्वरूपाची माहिती लघु पाटबंधारे विभागास पाठविल्याने या विभागाने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी आपल्या कार्यालयाने अपूर्ण व त्रोटक स्वरूपाची माहिती पाठविल्याने अहवाल तय्यार करणे अशक्य असल्याने जोडणीचा प्रस्ताव शासनास पाठविता येत नाही, असे कळविले. सदर पत्र पाटबंधारे विभागास २३ मार्च २०१८ रोजी प्राप्त झाले. त्यानंतर कार्यकारी अभियंता पाटबंधारे यांनी उपविभाग बदनापूर यांना पत्र देऊन सविस्तर माहिती पाठविण्याची सूचना दिली. मात्र दोन वर्ष उलटले तरी बदनापूर उपविभागाने अद्याप माहिती पाठविलेली नसल्याने प्रस्ताव लालफितीतच अडकला आहे. सध्या ही सोमठाणा येथील प्रकल्प पूर्ण भरला असून वाल्हा येथील धरणात मात्र 55 टक्के साठा असताना सोमठाणा व राजेवाडी येथील पाणी मात्र वाहून जाणार आहे. हे तिन्ही धरण जोडले तर तिन्ही धरणात पाणीसाठा होऊन तालुक्यातील पाणीटंचाई व सिंचनाचा प्रश्न निकाली निघू शकत असताना, प्रशासकीय व राजकीय इच्छा शक्तीअभावी हे प्रकल्प धूळखात पडले आहे. अशात धरणातून पाणी वाहून जात असल्याने हे धरणे जोडण्याची मागणी जोर धरत आहे.