जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. पर्यायाने व्यापार-उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील जनतेला विशेष करून निराधार महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, त्यांची ही अडचण लक्षात घेता आणि कोरोना संकटाशी दोन हात करत असतानाच महिला बचत गटांना एक उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. महिला बचत गटांनी तयार केलेले मास्क आरोग्य विभागामार्फत गाव स्तरावरील अंगणवाडी सेविका आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचारी यांना विनामूल्य वितरित करण्यात येणार आहेत.
खरेतर हे काम संबंधित बचत गटांचे आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असल्यामुळे या कामाची योग्य काळजी घेणे, त्यांना कपडा उपलब्ध करून देणे, आलेले मास्क योग्य पद्धतीचे आहेत किंवा नाही याची प्रकारची देखरेख करणे, आदी काम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जालनाचे जिल्हा व्यवस्थापक शैलेश चौधरी हे करत आहेत.
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : महाराष्ट्रातल्या 'या' आठ जिल्ह्यात एकही नाही कोरोनोचा रुग्ण
जालना जिल्ह्यामध्ये मास्कचा तुटवडा असताना जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यामधील बचत गटांना 10 हजार मास्क बनवण्यात येत आहेत. 'सात बाय नऊ इंच' आणि आणि दोन पदरी सुती कपड्यांमध्ये हे मास्क तयार करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद या बचत गटांकडून प्रत्येकी पंधरा रुपये याप्रमाणे ते खरेदी करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांना दीड लाख रुपयांचे उत्पन्न या माध्यमातून मिळाले आहे.