जालना - कोरोना विषाणू फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्ये आता शुकशुकाट जाणवत आहे. ग्रामीण जनताच शासकीय कार्यालयात येत नसल्याने बाराही महिने गजबजलेल्या या कार्यालयांना आता सुट्टीच्या दिवसांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कार्यालयांबाहेर पेट्या ठेवल्या आहेत. कामासाठी येणारे लोक आपले काम लिहून चिठ्ठी या पेट्यांमध्ये टाकत आहेत.
जालना पंचायत समिती ही तालुक्याच्या आणि विशेषतः ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू. इथे नेहमीच वर्दळ असते. मात्र, जिल्हाधिकार्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार इथे कार्यालयाच्या बाहेर पेटी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरजू कार्यालयाकडे येतच नाहीत. काही जण आले तरी आपले काम लिहून पेटीमध्ये चिठ्ठी टाकून जात आहेत. दिवसभर या पेटीमध्ये जमा झालेल्या तक्रारी आणि सूचना यांचा संध्याकाळी कार्यालय बंद होण्यापूर्वी संबंधित विभागाकडे पोहोचवल्या जात आहेत.