जालना - कोरोनामुळे जवळपास सर्वच व्यवसाय, उद्योगांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. जालना जिल्ह्यातील द्राक्ष बागा 60 टक्के बागवानी विक्री केल्या असल्या तरी उरलेल्या 40 टक्के बागांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मागणीच नसल्याने हताश झालेल्या बागायतदारांनी पोलिसांना द्राक्ष वाटली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेला जनता कर्फ्यू उठत नसल्यामुळे वाहतूक यंत्रणा ठप्प झाली असून याचा परिणाम द्राक्ष बागांवर झाला आहे. बागवान किलो दोन किलो अशा पद्धतीने द्राक्षे न विकता पूर्ण बागच विकतात आणि ठोक व्यापारी ट्रक, पिकप आदी वाहनांच्या माध्यमातून ते घेऊन जातात. मात्र, सध्या वाहतूक बंद असल्यामुळे या बागेतील द्राक्षे वेलीवरच सुकून जात आहेत.
तोडणीसाठी मजूरही परवडत नाहीत. सध्या बाजारात 20 किलो कॅरेटची किंमत दोनशे रुपये आहे. त्यानुसार दहा रुपये किलो प्रमाणे द्राक्षे बागवान विकत आहेत. एक 20 किलोच्या कॅरेट बाजारात नेऊन विकण्याचा खर्च पाहता "मुद्दल मे घाटा" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जालना तालुक्यातील शिरसवाडी येथील बागवान अलीबिन मुबारक, सदबीन मुबारक, रेहानखान खालेदखान, आशर्फ या शेतकऱ्यांनी आज आपल्या बागेतील द्राक्षे तोडून कोरोना सारख्या आजाराच्या आपत्कालीन परिस्थितीत शासकीय कर्मचारी सेवा देत आहेत, अशांना मोफत वाटप केले.
तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि शहरातील विविध चौकांमध्ये 10 ते 12 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना द्राक्षांचे मोफत वाटप केले. झालेले नुकसान शासनाने काहीतरी मदत करून भरून काढावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
जागेवरच द्राक्षे सडून वाया जाण्यापेक्षा सध्या चांगली द्राक्षे किमान जनतेसाठी झटणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तरी मिळावित ही मापक अपेक्षा असल्याचे अलीबिन मुबारक यांनी सांगितले.