जालना -शहरातील लोधी मोहल्ला भागात राहणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोनचा संसर्ग झाल्यामुळे आज सकाळी मृत्यू झाला आहे. हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सकाळीच प्राप्त झाला होता. जालना जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाने नऊ संभाव्य रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे अहवाल सकाळी आरोग्य विभागाला मिळाले होते. यामध्ये आज सकाळी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश होता. 60 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीला मधुमेहाचा आजार असल्याचेही निष्पन्न झाले होते. 9 पैकी 8 जण राज्य राखीव पोलीस बलाचे जणाचे जवान आहेत. त्या आठही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बुधवारपर्यंत जालना जिल्ह्याचा एकूण आकडा 315 पर्यंत गेला आहे. त्यापैकी 192जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र,आज कोरोनाबाधित रुग्णाच्या झालेल्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये पुन्हा या आजाराविषयी भीतीचे वातावरण पसरत आहे. दरम्यान, शुक्रवार पासून तीन दिवस जालना शहरात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा बसेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
जालना शहरासोबत जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळले आहेत. जाफराबाद सारख्या छोट्या गावांमध्ये कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालायतील एका कर्मचाऱ्याला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.