जालना- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खास कोरोना रुग्णालयाची उभारणी करण्यात यते आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोरील जागेत या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुसूदन राठोड यांनी दिली.
जालन्यात सुरू होणार कोरोना रुग्णालय.... हेही वाचा-मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील घनसावंगी मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी याकडे विशेष लक्ष दिल्याने रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड हे देखील या कामाच्या गतीवर लक्ष ठेवून आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग देखील तत्परता दाखवत पुढील पंधरा दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, असे सांगितले आहे.
या रुग्णालयासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असून डॉक्टर, नर्सेस, आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी 31 मार्च पासून मुलाखतीही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये रुग्णालय सुरू होण्याची शक्यता आहे. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकतीच या रुग्णालयाची पाहणी केली आहे. सामाजिक दायित्व निभावत जालना मर्चंट बँकेच्या वतीने या रुग्णालय उभारणीसाठी एक लाख रुपयांची मदतही बँकेचे अध्यक्ष अंकुश राऊत व उपाध्यक्ष मधुसूदन मुत्याल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहे.
रुग्णालय जरी कोरोना रुग्णालय म्हणून उभारले जात असले तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. केवळ पूर्वतयारी आणि जनतेची काळजी म्हणून हे रुग्णालय उभे राहत आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुसूदन राठोड यांनी सांगितले.