जालना :जालन्यात गुरुवारी गुरु गणेश मंगल कार्यालय येथे हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रातून गेलेली आहे. यानंतर जनतेचा कॉंग्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेला आहे. काँग्रेस विषयी जनतेचे प्रेम निर्माण झालेले आहे. त्या अनुषंगाने हात से हात जोडो हा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी आपले विचार व्यक्त केले.
उर्फी जावेदला प्रसिद्ध करण्याची सुपारी ? :यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सव्वालाखे म्हणाल्या की, उर्फी जावेदला प्रसिद्ध करण्याची सुपारी तर चित्रा वाघ यांनी घेतली नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. सध्या मीडियामध्ये उर्फी जावेद यांच्या वस्त्रावरून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वेगवेगळे वक्तव्य केले आहे. त्यावरून काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की चित्रा वाघ ह्या जेवढ्या जोमात महिलांचे आवाज उठवतात तेवढ्याच जोरात त्या निमूटपणे शांतसुद्धा होतात. उर्फीच्या कपड्याभोवती गुरफटण्यापेक्षा महाराष्ट्रात महिलांचे अनेक प्रश्न आहेत, महिलांच्या त्या प्रश्नाकडे चित्रा वाघ कधीही लक्ष देत नाहीत. कंगना राणावत यांच्या बेताल वक्तव्यावर चित्रा वाघ या गप्प असतात.