जालना- लोकसभा मतदारसंघाचे चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आहे. भाजपाच्यावतीने विद्यमान खासदार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर त्यांना तगडा उमेदवार कोण द्यायचा याविषयी सर्वच पक्षात चर्चा सुरू झाली. आता शेवटच्या टप्प्यात जालना लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून विलास औताडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे देखील आज जालन्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
काँग्रेसच्या महाराष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांना पक्षाने खासदार रावसाहेब दानवेंच्या विरोधात टक्कर देण्यासाठी उभे केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत देखील या दोघांनी समोरासमोर टक्कर दिली होती. मात्र, मोदी लाटेमध्ये विलास विलास औताडे यांचा निभाव लागला नाही. मागील ५ वर्षात भाजपने केलेली कामे त्याचसोबत भाजपवर झालेल्या विविध प्रकारच्या आरोपांमुळे रावसाहेब दानवे हे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाकडे वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याशिवाय ठोस मुद्दे नसल्यामुळे यावेळी देखील विलास औताडे यांना रावसाहेब दानवे यांच्याशी टक्कर देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.