जालना : जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या मातोश्री दिवंगत भुदेवी किशनराव गोरंट्याल यांच्या स्मरणार्थ गरजूंसाठी अन्नछत्र सुरू केले आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हातावर काम असणाऱ्यांना उपाशी बसण्याची वेळ येऊ नये म्हणून या अन्नछत्रातून दररोज सुमारे अडीच हजार लोकांना पोळीभाजीचे वितरण केले जात आहे.
आईच्या स्मरणार्थ आमदाराचे अन्नछत्र; रोज अडीच हजार लोकांना मिळतंय ताजे जेवण - food distribution camp at jalna
जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ अन्नछत्र सुरू केले. या अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज सुमारे अडीच हजार गरजूंना पोळी-भाजीचे वाटप करण्यात येत आहे.
विधानसभेची निवडणूक लागली आणि कैलास गोरंट्याल यांच्या मातोश्रींचे निधन झाले. या दुःखामुळे ते घराच्या बाहेर पडू शकले नाहीत. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीदेखील त्यांच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू होते. अशा परिस्थितीत त्यांनी ही निवडणूक जिंकली. मात्र, जनतेचे आपण काही देणे आहोत या भावनेतून सध्या जी परिस्थिती ओढवलेली आहे, त्यामध्ये मदतीचा हात देऊन जनतेचे उतराई होण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असेही गोरंट्याल म्हणाले. त्यांच्यासोबतच पत्नी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यादेखील या अन्नछत्रामध्ये सहभागी आहेत.
शहरातील विविध भागात असलेल्या गरजूंना दुपारी बारानंतर हे तयार अन्न पुरविल्या जाते. 'मागेल त्याला अन्न', अशा पद्धतीने नगरसेवकांच्या माध्यमातून ही यंत्रणा काम करत आहे. मंगळ बाजार परिसरात असलेल्या गोरंट्याल यांच्या जुन्या घरात सध्या या अन्नछत्राचा स्वयंपाक चालू आहे. त्यामुळे अन्नदानासोबतच आमदार कैलास गोरंट्याल यांच्या लहानपणीच्या आठवणीलाही तिथे उजाळा मिळाला आहे. डब्याच्या आणि प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून एक भाजी आणि दोन पोळ्या अशा पद्धतीचे हे फूड पॅकेट वितरित केल्या जात आहे. जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत हा उपक्रम चालूच राहील असेही आमदार गोरंट्याल म्हणाले.