जालना - चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला असून दुष्काळाची सरकारला चिंता नाही, असा आरोप आमदार बसवराज पाटील यांनी केला. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी ते जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी अंबड तालुक्यातील नंदी येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीची पाहणी केली.
काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दुष्काळ पाहणी समितीच्या अध्यक्षपदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुष्काळाची पाहणी करताना त्यांच्यासोबत या समितीतील पदाधिकारी आमदार सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कल्याणराव दळे, बाबुराव कुलकर्णी, सत्संग मुंडे, जालन्याचे शहराध्यक्ष शेख महेमुद आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळाच्या प्रश्नाबाबत प्रतिक्रिया देताना बसवराज पाटील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारला कोणत्याही प्रकारची चिंता नाही, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यात दौरा केला जाणार आहे. याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल आणि त्यावरून राज्य शासनाला योग्य ते उपाय करण्यासाठी भाग पाडले जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. दुष्काळाची जाणीव करून देण्यासाठी ही समिती मराठवाड्यात दौरे करत आहे. यावेळी मराठवाडा समन्वयक भीमराव डोंगरे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अन्यथा छावण्या बंद करू
शासनाने चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी ठरवून दिलेला दर वाढवून द्यावा अन्यथा लवकरच या छावण्या बंद कराव्या लागतील, असा इशारा ज्ञानसागर शिक्षण संस्था, नांदीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीचे अध्यक्ष सय्यद असलम सय्यद रजाक यांनी पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिला. मोठ्या जनावरांना दीडशे रुपये आणि लहान जनावरांना ९० रुपये दर द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.