जालना -जालना तहसील अंतर्गत मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दुरुस्तीनंतर संबंधित मतदारांना आक्षेप नोंदविण्यासाठीही मुदत देण्यात आली होती. आज या आक्षेपांवर जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान अनेक गावांच्या नागरिकांनी संबंधित सेवकांवर याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला. या वेळी, ग्रामसेवकासोबत शाब्दिक चकमकही झाली. याच वेळी काही ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात गर्दी करून त्यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक चकमकीचे चित्रीकरणही केले आहे. दरम्यान, आक्षेप नोंदविल्यानंतरही मतदार यादीत दुरुस्ती करण्यात आली नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही मतदारांनी दिला आहे.
जालना तालुक्यात 86 ग्रामपंचायतच्या मतदार याद्यांची दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनंतर नवीन याद्या संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयावर नागरिकांच्या अवलोकनार्थ लावण्यात आल्या होत्या. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान नागरिकांना या याद्यांवर आक्षेप घेण्याची मुदतही तहसीलदारांनी दिली होती. आज दिनांक आठ रोजी ज्यांनी आक्षेप घेतले आहेत, अशांच्या या अर्जांवर सुनावणी होती. त्यानुसार, आज सकाळपासूनच जालना तहसीलदार कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती. सुनावणीदरम्यान ज्या मतदारांचे आक्षेप होते त्यांना ताबडतोब उत्तर हवे होते. हे उत्तर तहसीलदारांनी लगेच न देता संबंधित गावच्या मतदार यादी निवड समितीच्या अहवालावरून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. मतदार यादी दुरुस्तीच्या समितीमध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी पर्यवेक्षक यांचा समावेश होता. दरम्यान, काही पुढाऱ्यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून वार्ड रचनेनुसार मतदार याद्यांची फेरफार केली, असा आरोप जालना तालुक्यातील रेवगाव या गावासह बाजिउम्रद आणि अन्य काही गावकऱ्यांनी केला होता. त्यानुसार हे मतदार सुनावणीसाठी हजर होते. मात्र, योग्य, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तहसीलदारांच्या दालनात गर्दी झाली आणि या गर्दीतून तहसीलदार आणि मतदार यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या.
हेही वाचा -ॲमेझॉनला मराठी नको, मग आम्हालाही महाराष्ट्रात अॅमेझॉन नको; मनसेचा इशारा