जालना- स्थानिक गुन्हे शाखेने ऑक्टोबर 2015 मध्ये बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला होता. धुळे आणि जळगाव येथून हा दारू साठा आणत असताना जालना बस स्थानक परिसरात एक वाहन पकडून सुमारे 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यापैकीच सुमारे 88 हजारांचा हा बनावट दारू साठा होता.
तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना बनावट दारूसाठा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बसस्थानक परिसरात त्यांनी वाहन क्रमांक एम.एच 22-6309 पकडले. त्यामध्ये बनावट दारूचे बॉक्स सापडले. पोलिसांनी शंकर त्र्यंबक सोनटक्के (रा. प्रसादनगर परभणी) दीपक किशन हाके (रा. सद्गुरुनगर, परभणी) सखाराम विठोबा चुडावकर (सहस्पूर परभणी) यांना ताब्यात घेतले होते. ही बनावट दारू तयार करण्यासाठी परभणी तालुक्यातील लिंबा या गावच्या एका शेतामध्ये व्यवस्था केली होती. त्यासाठी लागणारे स्पिरीट, लेबल, बॉटलचे झाकण आदी साहित्यही जप्त केले होते. आरोपींनी हे स्पिरीट धुळे आणि जळगाव येथून आणून मराठवाड्यात विकणार असल्याचे सांगितले.