महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यातील 39 स्पर्धा परीक्षा केंद्र चालकांसमोर कर्जाचे हप्ते फेडण्याचे संकट - जालना स्पर्धा परीक्षा केंद्र

लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अभ्यासिकेचे भाडे माफ करण्याबाबत संबंधित जागा मालकाला कळवावे. वैयक्तिक कर्ज काढून अभ्यासीकेमध्ये फर्निचर तयार केले आहे, या फर्निचर चे हप्ते आता सुरू होणार आहेत, या कर्जफेडीसाठी मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन
निवेदन

By

Published : Aug 30, 2020, 8:24 PM IST

जालना - जिल्ह्यातील 39 स्पर्धा परीक्षा केंद्र चालकांसमोर कर्जाचे हप्ते फेडण्याचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने अभ्यासिका सुरू करण्यासाठी त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेच्यावतीने पालकमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

परीक्षा केंद्रांची मागणी

जालना जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत 39 स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू आहेत. त्यापैकी 19 केंद्र हे जालना शहरात आहेत. या केंद्रा व्यतिरिक्त पहिलीपासून एमपीएससी, यूपीएससी आणि अन्य काही क्लासेस असे सुमारे 200 क्लासेस सुरू आहेत. प्रत्येक क्लासेसमध्ये दहा शिक्षक आणि अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून पन्नास हजार विद्यार्थांना ज्ञानदानाचे काम होते. यातूनच उच्चशिक्षित अधिकारीही घडताहेत एवढी मोठी जबाबदारी पार पाडणाऱ्या स्पर्धा परीक्षा केंद्रांना गेल्या चार महिन्यांपासून टाळे आहे. त्यामुळे हा सर्व डोलारा चालवणे कठीण झाले आहे. अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यासाठी मोठी जागा लागते जी भाड्याने घ्यावी लागते, यानंतर या जागेत फर्निचर देखील तयार करावे लागते. दरम्यान, एकदा जागा तयार करून सोडल्यास परत जागा तयार करण्यास अनेक अडचणी येतात, म्हणून गेल्या चार महिन्यांपासून या जागेचे भाडे जागामालकांना द्यावे लागत आहे. तसेच लवकरच फर्निचरसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते देखील सुरू होतील, त्यामुळे अभ्यासिका त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन

लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अभ्यासिकेचे भाडे माफ करण्याबाबत संबंधित जागा मालकाला कळवावे. वैयक्तिक कर्ज काढून अभ्यासिकेमध्ये फर्निचर तयार केले आहे, या फर्निचर चे हप्ते आता सुरू होणार आहेत, या कर्जफेडीसाठी मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासोबतच अभ्यासिका सुरू झाल्यानंतर सुरक्षित अंतराचे भान ठेवले जाईल याची ग्वाही देखील देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष विजय सुरासे, प्रवीण घुगे, सुधीर हजारे, शरद कवालकर, मुकुंद कुलकर्णी, गजेंद्र काकडे, सुरेश जगताप, सुरेश पोहार, गणेश खरात आदी शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details