जालना - काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे. भाजप-शिवसेना युतीचे जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जालन्यात आले होते. अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
जालन्यात जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी चहापाण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यासोबत जाऊन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र बीनवडे यांच्याकडे उमेदवारी दाखल केली. यावेळी अर्जुन खोतकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती होती. उमेदवारी दाखल केल्यानंतर मामा चौकातून जुन्या जालन्यातील स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडासंकुलापर्यंत भाजपची रॅली काढण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी मतदारांना संबोधित करताना काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चांगलीच खिल्ली उडवली. ते म्हणाले, खरेतर काँग्रेसचा जाहीरनामा काल म्हणजे १ एप्रिलच्या मुहूर्तावर जाहीर करायला हवा होता. जेणेकरून जनतेची एप्रिल फुलची इच्छा पूर्ण झाली असती. परंतु आज त्यांनी जाहीर केला असला तरी त्यांचा हा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत जे आत्तापर्यंत कधीही पूर्ण झालेले नाहीत. निवडणुका आल्या की गरिबी हटावच्या घोषणा देतात आणि निवडणुका गेल्या की स्वतःची गरिबी हटवून घेतात, अशी काँग्रेसची परंपरा आहे. मात्र, यावर जनता आता विश्वास ठेवत नाही.
पांडवांच्या कळपातून अर्जुन हा कौरवांकडे जाण्यासाठी निघाला होता. मात्र, श्रीकृष्ण रुपी उद्धवाने अर्जुनाला गीतेचा उपदेश सांगितला आणि परत पांडवात सामील केले, असे म्हणून त्यांनी अर्जुन खोतकर यांची पाठराखण केली. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नामदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, पैठणचे आमदार संदिपान भुमरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर, आमदार संतोष दानवे आदींची उपस्थिती होती.