जालना -महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पादनांच्या नोंदणीसाठी असलेल्या हॉर्टनेट या संगणक प्रणालीत आता 'सिट्रसनेट' या श्रेणीची भर पाडली आहे. यावर लिंबूवर्गीय फळ बागांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. या प्रणालीवर राज्यात सर्वात प्रथम नोंदणी बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राने केली असून या मोसंबी बागेला एक विशिष्ट असा नंबरदेखील मिळाला आहे.
सिट्रसनेट या प्रणालीद्वारे मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळाच्या निर्यातीची संधी चालून आली आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. बदनापूर येथील मराठवाडा कृषी विदयापीठाच्या मोसंबी संशोधन केंद्रातील मोसंबी बागेची नोंदणी करण्यासाठी कुलगुरू डॉ. ए. एस. ढवन आणि संचालक संशोधन डॉ. डी. पी. वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे अधिकारी व कृषी संशोधक डॉ. संजय पाटील यांनी पुढाकार घेतला.