जालना -नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नाताळनिमित्त बुधवारी ख्रिस्ती बांधवांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बदनापूर येथील ख्रिस्ती बांधवांनी घरांवर आकाशकंदील लावून सण साजरा केला आहे. चर्चंमध्येही रोषणाई आणि सुंदर सजावट करण्यात आली आहे.
हेही वाचा -ख्रिसमसदिवशीच जनशताब्दी रेल्वे रद्द , प्रवाशांचे हाल
जालना-औरंगाबाद मुख्य रस्त्यावर बसस्थानकालगतच चर्च असून या चर्चला रंगीबेरंगी दिव्यांची आरास केली आहे. रात्री दहाला नाताळ गीते, पवित्र मिसा (प्रार्थना) करण्यात आली. चर्चमध्ये ख्रिस्त जन्माचा देखावा सादर करण्यात आलेला आहे. नाताळनिमित्त जागोजागी ख्रिसमस ट्री सजविण्यात आले आहेत. विविध संस्थांतर्फे धार्मिक गीतगायन स्पर्धा, ख्रिस्त जन्माची नाटिका, रांगोळी स्पर्धा यांसह निरनिराळे कार्यक्रम ठेवण्यात आलेले असून ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा -एनआरसी आणि सीएए विरोधात सोमवारी 'भोकरदन बंद'
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच १ जानेवारीला सकाळी प्रार्थना आणि नूतन वर्षाची उपासना होणार आहे. शहरातील चर्चच्या इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्तासाठी शहरात विविध उपक्रम सुरू आहेत. केवळ चर्चच नव्हे, तर ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरांवरही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शहरात सर्वत्र नाताळचा उत्साह दिसून येत असून गृहिणी गोड-धोड बनवण्यात व्यस्त असून बालगोपालांतही प्रचंड उत्साह आहे.