जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (बुधवारी) शहरात येणार आहेत. त्यामुळे नगरपालिकेने ज्या रस्त्यावरून मुख्यमंत्री जाणार आहेत. त्या रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे नगरपालिकेने शहरात स्वच्छता मोहीम राबवली मुख्यमंत्री शहरात येणार असून ते आज रात्री मुक्काम करणार आहेत. त्यामुळे नगरपालिकेने शहरातील सर्व रस्ते स्वच्छ केले आहेत. नगरपालिकेच्या या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील हुतात्म्यांच्या पुतळ्यांना मात्र, चांगले दिवस आले आहेत. जालन्याच्या विकासासाठी अनेक आंदोलनाचे साक्षीदार असलेल्या हुतात्मा जनार्दन मामा पुतळ्याची दुरुस्तीही ही अचानक सुरू झाली आहे. त्यामुळे या पुतळ्या सोबतच शहरातील अनेक पुतळ्यांची ही दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा -केंद्राप्रमाणे आता राज्यातही विरोधी पक्षनेता राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रस्ते स्वच्छ केले पण मोकाट जनावराचे काय?
शहरात सर्वच भागात मोकाट जनावरांचा मुक्त वावर आहे. पालिकेकडे कोंडवाडा नाही आणि या जनावरांना धरण्याची हिंमतही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ही जनावरे म्हणजे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. सकाळी कार्यालयांच्या वेळेत, शाळेच्या वेळेत ही मोकाट जनावरे रस्त्यावर फिरतात. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ही जनावरे जर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला आडवी गेली तर त्यांनी रोखणार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.