महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना : भरदिवसा उपसभापतींच्या उभ्या कारची काच फोडून रोकड लंपास - जालना गुन्हे वृत्त

पंचायत समिती उपसभापतींच्या कारची काच फोडून डिक्कीमध्ये असलेली 66 हजार रुपयाची रोकड चोरटयांनी भर दिवसा लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Cash thift smashing the glass
कारची काच फोडून रोकड लंपास

By

Published : Nov 13, 2020, 6:50 PM IST

बदनापूर (जालना) - पंचायत समिती उपसभापतींच्या कारची काच फोडून डिक्कीमध्ये असलेली 66 हजार रुपयाची रोकड चोरटयांनी भर दिवसा लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे. उपसभापती औरंगाबाद- जालना मुख्य रस्त्यावर कार पार्क करून कामानिमित्त बँकेत गेले असताना ही घटना घडली.

बदनापूर पंचायत समितीचे उपसभापती रवीकुमार बोचरे हे सायगाव (ता. बदनापूर) येथील निवासी असून ते बदनापूर येथे येण्यासाठी कारचा (एमएच 21 बीएफ 2115) वापर करतात. शुक्रवार बाजाराचा दिवस असल्यामुळे व दिवाळी सणानिमित्त त्यांनी आज सकाळी येथील महाराष्ट्र बँकेतून 79,000 रुपये काढले. सदरील रोकड त्यांनी कारच्या डाव्या बाजूकडील डिक्कीत ठेवून पंचायत समिती कार्यालयाकडे निघाले असता औरंगाबाद – जालना मुख्य रस्त्यावरील साई सावता हॉटेलसमोर थांबून त्यांनी सायगाव येथील कडूबा शिंदे यांना यातील 10 हजार रुपये दिले व बाजार असल्यामुळे खर्चासाठी तीन हजार रुपये काढून बाकी उरलेले 66 हजार रुपये पुन्हा डिक्कीत ठेवले.

गाडी लॉक करून साईडला उभी करून उपसभापती बोचरे हे सभापती बी. टी. शिंदे यांच्यासोबत समोरच असलेल्या कॅनेरा बँकेत कामानिमित्त गेले. तेथील काम 10 मिनिटात आटोपून ते कारजवळ आले असता कारच्या डाव्या बाजूची काच तोडून डिक्कीतील 66 हजार रुपये अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी तात्काळ बदनापूर पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. जालना- औरंगाबाद मुख्य रस्त्यावर दिवाळीमुळे प्रचंड वाहतूक आहे. तसेच बदनापूरच्या आठवडी बाजारामुळे मोठी गर्दी असताना थेट काच फोडून पैसे लंपास केल्यामुळे परिसरात मात्र खळबळ उडाली. दरम्यान सह पोलिस उपनिरीक्षक शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details