जालना -औरंगाबाद महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर पुन्हा एक विचित्र अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. अपघातादरम्यान महावितरण कंपनीचा खांब पडल्याने रात्रीपासून हायपावर उच्चदाब वीजपुरवठा खंडित झाला होता.
जालन्याहून औरंगाबादकडे टेम्पो आणि कार ही वाहने जात होती. वाहन मागे-पुढे घेण्याच्या कारणावरून या दोन्ही वाहन चालकांची शाब्दिक चकमक झाली. त्यांच्यात सुरू असलेली शाब्दिक चकमक ही ट्रेलर चालकाने पाहिली आणि आपले वाहन रस्त्याच्या खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ट्रेलर विजेच्या खांबाला जाऊन धडकला.